केंद्र सरकार मोफत देईल FASTag, फक्त ‘हे’ डाक्युमेंट सोबत घेऊन जाण्यास विसरू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून फास्टॅग मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण (एनएचएआय) ने फास्टॅगचा 100 रुपये खर्च 15 दिवसांसाठी माफ केला आहे. एनएचएआयने म्हटले की, हा नवा नियम 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत प्रभावी राहिल. रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग (एनएच) टोल प्लाजामध्ये फास्टॅगद्वारे डिजिटल संकलन अधिक वाढविण्यासाठी एनएचएआयकडून 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत 100 रुपयांचा फास्टॅग मोफत मिळणार आहे.

वाहन मालक कोणत्याही अधिकृत पॉईंट-ऑफ-सेलवर वाहनाच्या वैध नोंदणी प्रमाणपत्रासह (आरसी) जाऊन फास्टॅग मोफत मिळवू शकतात. एनएचएआयने 15 डिसेंबर 2019 पासून देशातील सर्व 527 टोल प्लाझावर इलेक्ट्रॉनिक टोल वसूली बंधनकारक केली आहे. सरकारने किमान 75 टक्के टोल लेनमध्ये फास्टॅगचा वापर बंधनकारक केला आहे. अजूनही 25 टक्के लेनमध्ये विनाफास्टॅग टोल भरण्यास सूट आहे. फास्टॅग खरेदी करण्यासाठी किती खर्च येतो, हा प्रश्न अनेकजण विचारतात. अधिकृत बँक फास्टॅग जारी करण्यासाठी कमाल 100 रुपये शुल्क आहे. हे एनपीसीआयने ठरवले आहे. आता सरकारच्या निर्णयानंतर हे शुल्क माफ करण्यात आले आहे.

बँक, फास्टॅग विकत घेणार्‍या वाहनधारकाकडून पहिल्यांदा सुरक्षा निधी व अन्य शुल्कासह बॅलन्स अमाउंट खात्यात ठेवण्यासाठी काही रक्कम घेते. परंतु टॅग जारी करण्याचा चार्ज बँका ठरवतात. हा विविध बँकांसाठी वेगवेगळा आहे. यासोबतच फास्टॅगचे टॉप-अप चार्जसुद्धा वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे आहेत. याबाबत तुम्ही संबंधित बँकांमध्ये जाऊन माहिती घेवू शकता. किंवा बँकेच्या वेबसाईटवर माहिती घेऊ शकता. जर तुमचा फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक आहे तर तुम्हाला प्रीपेड वॉलेटमध्ये वेगळे पैसे बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. परंतु लिंक असलेल्या खात्यात योग्य रक्कम ठेवावी लागेल. यासाठी घरातून निघताना हे लक्षात ठेवा, कारण टोल प्लाझावर पैसे भरणे सुलभ होईल.

जर तुम्ही फास्टॅगला प्रीपेड वॉलेटशी लिंक केले आहे तर क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / एनईएफटी / आरटीजीएस किंवा नेट-बँकिंग, चेक किंवा अन्य ऑनलाइन माध्यम यापैकी एकाचा वापर करून तुम्ही रिचार्ज करू शकता. अशापद्धतीने रिचार्ज करण्यासाठी काही अतिरिक्त शुल्क तुुम्हाला भरावे लागेल. केवायसी केलेले वाहन चालक किंवा फास्टॅग घेणारा व्यक्ती यामध्ये 1 लाख रूपयांपर्यंत रिचार्ज करू शकतो. तर लिमिटेड केवायसीवाले आपल्या फास्टॅग प्रीपेड वॉलेटमध्ये वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवू शकत नाहीत. केवळ हेच नव्हे, तर दर महिन्याला यामध्ये रक्कम टाकण्याची मर्यादा सुद्धा वीस हजार रूपये आहे.