NIA ला मोठं यश ! पुलवामा हल्ल्याप्रकरणी बाप-लेकीला अटक, रचला होता हल्ल्याचा कट

श्रीनगर : वृत्त संस्था – पुलवामा दशहतवादी हल्ल्याच्या तपासात मंगळवारी मोठे यश मिळाले. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने एका व्यक्ती आणि त्याच्या मुलीला अटक केली, जे कथितरित्या या हल्ल्याच्या कटातील प्रत्यक्षदर्शी आहेत. या दोघांची नावे पीर तारिक आणि इंशा अशी आहेत. मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डारने स्फोटकांनी भरलेली आपली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळली होती. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. आदिलचा शेवटचा व्हिडिओ दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून जैश-ए-मोहम्मदने प्रसिद्ध केला होता.

तपासादरम्यान, एनआयएला माहिती मिळाली की, हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील हदकीपोरा येथील एका घरात शूट करण्यात आला आहे. हे घर अटक करण्यात आलेले बाप-लेक तारिक अहमद शाह आणि इंशा जान यांचे आहे. ट्रक ड्रायव्हर असलेल्या तारिक अहमद शाहने सांगितले की, आदिल अहमद डार, पाकिस्तानी दहशतवादी आणि आयईडी बनवणारे मोहम्मद उमर फारुक, अन्य पाकिस्तानी दहशतवादी कामरान, पुलवामा येथे राहणारा जैशचा दहशतवादी समीर अहमद डार आणि पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल उर्फ इब्राहिम उर्फ अदनान यांनी त्यांच्या घराचा वापर केला होता. फारुक आणि कामरान दोघेही सुरक्षा दलांच्या चकमकीत मारले गेले.

प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, शाहने दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय देऊन त्यांना मदत केली. दहशतवाद्यांनी त्याच्या घरातच सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याची योजना तयार केली आणि आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद डार याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जैशने पुलवामा हल्ल्यानंतर ताबडतोब जारी केला. प्रवक्त्याने म्हटले की, इंशा जान (23) ने सुद्धा दहशतवाद्यांना साथ दिली. 2018-19 दरम्यान 15 पेक्षा जास्त वेळा घरात दोन ते चार दिवस राहिल्यानंतर त्यांना जेवण आणि अन्य वस्तू पुरवल्या.

प्रवक्त्याने सांगितले की, प्राथमिक तपासात समजले की, इंशा जान आयईडी बनवणार्‍या मोहम्मद उमर फारुक जिवंत असताना टेलीफोन आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याशी सतत संपर्कात होती. अटक करण्यात आलेल्या दोघांमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. कारण हल्ल्यात सहभागी असणार्‍या पाच जणांना सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केल्याने या तपासाचे जवळपास सर्वच मार्ग बंद झाले होते.

जैशच्या दहशतवाद्याला केले अटक
यापूर्वी एनआयएने मागच्या शुक्रवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी जैश-ए-मोहम्मदच्या एका दशहतवाद्याला अटक केली होती. अधिकार्‍यांनी महिती देताना सांगितले की, 22 वर्षीय शाकिर बशीर मारगेने आत्मघाती बॉम्ब हल्लेखोर आदिल अहमद डारला आश्रय देणे आणि शस्त्र, स्फोटके इत्यादी मदत केली होती. शाकिर बशीर जैशचा स्थानिक दहशतवादी आहे. मारगे पुलवामाच्या काकापोराच्या हाजीबल येथील राहणारा आहे. त्याचे फर्नीचरचे दुकान आहे.

एनआयएच्या चौकशीत शाकिरने कबूल केले की, आदिल डार त्याच्या घरी सहकार्‍यांसोबत थांबला होता आणि तेथूनच त्याने हल्ल्याची पूर्ण तयारी केली होती. जेथे हल्ला झाला होता, तेथेच शाकिरचे दुकान होते, तेथून शाकिरने सीआरपीएफच्या ताफ्याची हेरगिरी केली आणि आदिल डारला सर्व माहिती दिली. चौकशीसाठी एनआयएने शाकिरला 15 दिवसांच्या रिमांडमध्ये घेतले आहे.