पुलवामा : सीआरपीएफ ग्रुप सेंटरवर हल्ल्यासाठी गाडी पुरविणार्‍याला एनआयएकडून अटक

वृत्‍तसंस्था : पुलवामा येथील लेथपोरामधील सीआरपीएफच्या ग्रुप सेंटरवर आत्मघाती हल्‍ला केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एकाला अटक केली आहे. हल्ल्याप्रकरणी ही पाचवी अटक आहे. एनआयएने इरशाद अहमद नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. इरशाद अहमद हा काश्मीरमधील रत्नीपोरा येथील रहिवाशी आहे. यापुर्वी फैयाज अहमद मागरे, मंसूर अहमद भट, निसार अहमद तांत्रे आणि हिलाल अंद्राबी यांना अटक करण्यात आली होती. तांत्रे याला तपास यंत्रणांनी दुबईहून परतताना दिल्‍ली विमानतळावर अटक केली होती.

आरोपी निसार अहमद तांत्रे आणि सैय्यद हिलाल अंद्राबी यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरूनच इरशाद अहमदला अटक करण्यात आली आहे. इरशाद अहमद हा हल्‍ला प्रकरणातील महत्वाचा आरोपी आहे. इरशादनेच दहशतवाद्यांना आश्रय दिला होता तसेच त्यांना हल्ल्यासाठी गाडी देखील उपलब्ध करून दिली होती. लेथपोराच्या सीआरपीएफ ग्रुप सेंटरची रेकी देखील इरशाद अहमदने केल्याचे एनआयएच्या तपासात पुढे आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इरशाद अहमद हा जैश ए मोहम्मदचा अतिरेकी असुन तो जैश कमांडर नूर मोहम्मद तांत्रेच्या अतिशय जवळचा आहे. नूर मोहम्मद तांत्रेला सन 2017 मध्ये जवानांनी कंठस्नान घातले होते. त्याचाच बदला म्हणून सीआयपीएफ ग्रुपवर हल्‍ला करण्यात आला. दि. 30 डिसेंबर 2017 रोजी पुलवामाच्या लेथपोरा येथील सीआरपीएफच्या गु्रप सेंटरवर आत्मघाती हल्‍ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये 5 जवान शहीद झाले होते.