NIA ची पुण्यात मोठी कारवाई, दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून तरूणीसह दोघे ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएच्या पथकाने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पुण्यातून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. याघटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

येरवडा व कोंढवा भागातून त्यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा व कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. येरवडा येथून सादीया अन्वर शेख आणि कोंढव्यातून नबील सिद्धीकी खत्री यांना पकडले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा दिल्ली व मुंबई यांच्यासह महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना माहितीवरून पकडले. इस्लामिक स्टेट ऑफ इराक ही संघटना दक्षिण आशिया आणि मध्यवर्ती आशिया याठिकाणी कार्यरत आहे. या संघटनेने एका बॉम्बस्फोट प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. दोघे पुण्यात असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना पकडले आहे. यादरम्यान, दोघांचीही तपास यंत्रणेकडून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे.