विशाखापट्टणम ‘हेरगिरी’ प्रकरणातील मुख्य सुत्रधार लकडावाला याला मुंबईतून अटक

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  भारतीय पाणबुड्या, शस्त्रागारं, नौदलाची ठाणी अशी महत्त्वाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱा हेर मोहम्मद हरूज हाजी अब्दुल रेहमान लकडावाला याला NIA ने मुंबईतून अटक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम इथल्या हेरगिरी प्रकरणी रेहमान याचे नाव पुढे आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्या वेळीच लकडावाला याच्यावर गुन्हा नोंदवला होता.

लकडावाला अनेकवेळा पाकिस्तानला गेला होता. हेरगिरी बाबत पाकिस्तानमध्ये त्यानं विशेष ट्रेनिंग घेतल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. 49 वर्षाच्या या पाक हेराला अखेर मुंबईतून अटक करण्यात आली आहे. भारतातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांची खास करून नौदलाच्या पाणबुड्यांची अतिसंवेदनशील माहिती, नौदलाची ठिकाणे, शस्त्रागारांचे ठिकाणं यासारखी गुप्त माहिती पाकिस्तानी हेर पाकिस्तानला पोहोचवत होता.

आतापर्यंत झालेल्या तपासानुसार नौदलाचे काही जण एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होते. फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियातून ते संपर्कात होते. धक्कादायक म्हणजे नौदलाशी संबंधित असलेल्यांकडूनच नौदलाची गुप्त माहिती मिळवण्याकरता हा पाकिस्तानचा हेर त्यांना पैसे देत होता. याप्रकरणात आतापर्यंत 11 नौदलाच्या व्यक्तींसोबत एका पाकिस्तानी वंशाच्या भारतीय नागरिकत्व असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शाइस्ता कैसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतून पकडण्यात आलेला आरोपी लकडावाला हा पाकिस्तानातील कराचीला बऱ्याच वेळा जाऊन आला आहे. कराचीत क्रॉस बॉर्डर ट्रेडच्या नावाखाली हा आरोपी त्याच्या साथिदारांना भेटत होता. यावेळी तो पाकिस्तानी गुप्तहेर अकबर उर्फ अली, रिजवान यांना भटला होता. लकडावाला याच्या माध्यमातून नौदलाच्या 11 आरोपींच्या बँक खात्यात पैसे भरण्यात येत असल्याची माहिती पुढे आली होती.