बनावट नोटा चोरणाऱ्या NIAच्या हवालदाराला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलला जप्त केलेल्या बनावट नोटा चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. एनआयएने जप्त केलेल्या बनावट नोटा कार्यालयाच्या स्टोअररूममध्ये ठेवल्या होत्या. कॉन्स्टेबलने स्टोअररूममध्ये लावण्यात आलेल्या एसीच्या खिडकीतून खोलीत प्रवेश करून नोटा चोरल्या. कॉन्स्टेबलसह एका पेंट्री कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याविषयी माहिती देताना सांगितले कि, जप्त केलेल्या नोटा एनआयएच्या स्टोअररूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्या नोटा खऱ्या असल्याचा समज कॉन्स्टेबलला झाला. त्यामुळे त्याने एसीच्या खिडकीतून स्टोअररूममध्ये प्रवेश करून नकली नोटा चोरल्या. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरलेल्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या खोट्या नोटा या भारतीय चलनातील आहेत.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या स्टोअररूममधून मागील आठवड्यात कॉन्स्टेबल आणि पेंट्री कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या नकली नोटा चोरल्या. चोरीचा प्रकार लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. दोघांकडून जप्त केलेल्या नकली नोटा जप्त केल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांवर दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –