पुलवामा केसमध्ये 13500 पानांचं चार्जशीट, NiA नं केली पाकिस्तानच्या आतंकी कटाची ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोषारोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र जम्मूच्या एनआयए न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. एनआयएने आरोपपत्रात 19 आरोपींची नावे दिली असून त्यापैकी 6 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. जैश-ए-मोहम्मदचा नेता मौलाना मसूद अझरही आरोपींमध्ये आहे. तर हल्ला करणारा आत्मघातकी दहशतवादी आदिल डार स्फोटातच ठार झाला. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या कारला सीआरपीएफच्या ताफ्यात घुसविले. या स्फोटात 40 सैनिक शाहिद झाले. त्यानंतर एनआयए या प्रकरणाचा तपास करत होता. आता एनआयएने 13500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

आदिल अहमद डार नावाच्या आत्मघाती दहशतवाद्याने हा दहशतवादी हल्ला केला होता, जो मारला गेला आहे. आदिलसह हल्ल्यासाठी आयईडी बनविणारा ओमर फारूकही मारला गेला आहे, एनआयएने आपल्या आरोपपत्रात आदिलचे मदतनीस असलेल्या लोकांवरही आरोप केले होते. तसेच पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांच्या मालकांवरसुद्धा आरोपपत्रात आरोप करण्यात आले आहेत.

7 पाकिस्तानी आरोपींची नावे :
एनआयएने आरोपपत्रात जैश-ए-मोहम्मदचा नेता मौलाना मसूद अझहरला पहिला आरोपी बनविला आहे. मसूद व्यतिरिक्त त्याचा भाऊ अब्दुल रऊफ आणि मौलाना अम्मार यांच्यावरही आरोप केले आहेत. बालाकोटमध्ये मौलाना अम्मार जैश दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो. याशिवाय इस्माईल, उमर फारूक, कामरान अली आणि कारी यासीर यांचीही नावे आरोपपत्रात आहेत. हे चौघेही पाकिस्तानी आहेत. यापैकी ओमर, यासिर आणि कामरान हे ठार झाले आहेत.

काश्मीरमध्ये उपस्थित मदतनीसही अडकले
पुलवामा हल्ला करणारा आदिल डार यांचे बरेच मदतनीसही होते, एनआयएनेही अशा लोकांनाही आरोपी केले आहे. आदिल डारसोबत मदतनीसांवरही आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये शाकिर बशीर, इंशा जहां, पीर तारिक अहमद, वाईज-उल इस्लाम, अब्बास राथर, बिलाल अहमद कुचे, इक्बाल राथर, समीर अहमद डार, आशाक अहमद नेंगरू, आदिल अहमद दार, सज्जाद अहमद भट्ट आणि मुदस्सीर अहमद खान यांचा समावेश आहे. म्हणजेच सात आरोपी पाकिस्तानी आहेत, तर 12 काश्मिरी आहेत. काश्मिरी दहशतवाद्यांपैकी आदिल डार , सज्जाद अहमद भट्ट आणि मुदस्सिर अहमद खान ठार झाले आहेत. शकीरने हल्ल्यासाठी मोटार उपलब्ध करून दिली होती, तसेच स्फोटके, आयईडी पुरविली होती. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून अब्बास राथरने हल्ल्यात मदत केली.