PPE किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझे की आणखी कोण ? NIA कडून युध्दपातळीवर तपास सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ सापडल्यामुळे त्या प्रकरणातील तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे हे करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक झाल्यानंतर पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त करण्यात आली आहे. सध्या सचिन वाझे हे पोलीस कोठडीत आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती व्यक्ती स्पष्ट दिसत आहे. आता ती व्यक्ती वाझे होते की, आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? याचा तपास एनआयएकडून करण्यात येत आहे.

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात वापरलेली पांढरी इनोव्हा गाडी ‘एनआयए’ने मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागातून (एमटी) रविवारी पहाटे जप्त केली. ही गाडी शासकीय असून, वाझे यांच्या पथकात कार्यरत होती, हे स्पष्ट झाले आहे. गुन्हे शाखा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्याकडून या गाडीचा कसोशीने शोध घेण्यात येत होता.

सचिन वाझे हे गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष (सीआययू) या अत्यंत संवेदनशील, महत्त्वाच्या विभागाचे प्रमुख होते. त्यांना शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ‘एनआयए’कडून अटक करण्यात आली. ‘एनआयए’ने अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे. तसेच ‘एनआयए’कडून ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र, अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’, असा संशय असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किटमध्ये असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. एनआयएकडून त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. जेव्हा जिलेटीन असलेली गाडी पार्क करण्यात आली, त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? पीपीई किटमध्ये वाझे होते की दुसरी व्यक्ती होती? याचा तपास एनआयएकडून करण्यात येत आहे.