पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; NIA करणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिननं भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. दरम्यानच्या काळात स्कॉर्पिओचे मालक व्यवसायिक मनसुख हिरेन त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे सचिन वाझे यांच्यावर आरोप होऊ लागले. हा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही चर्चिला गेला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी वाझेंवर गंभीर आरोप केले. ठाकरे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला या प्रकरणाच्या तपासामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून एटीएसने सचिन वाझे यांची चौकशी केली आहे. पुन्हा एकदा त्यांची चौकशी होणार असून आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या पथकानं हिरेन यांच्या पत्नीची चौकशी केली. हिरेन यांच्या पत्नीनं चौकशीदरम्यान वाझेंवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे या संदर्भात एटीएस पुन्हा एकदा वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाझेंच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेल्या आढळल्या गाडीच्या तपासात वाझे यांची एनआयएकडून आज किंवा उद्या वाझेंची चौकशी केली जाऊ शकते. दरम्यान. बुधवारी विधिमंडळात गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंची गुन्हे शाखेतून बदली करत असल्याची घोषणा केली.

सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
सचिन वाझे यांच्यावरून विधिमंडळ अधिवेशनात घमासान सुरु आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारची कोंडी केल्याचे दिसून येत आहे. विरोधकांच्या सतत होणाऱ्या आरोपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल आहे. ते म्हणाले,सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? एका आरोपीला उचलून आणले म्हणून त्याला लटकवताय का? चौकशीत काय ते सत्य बाहेर येईलच पण त्याआधीच ‘आधी फाशी अन् मग चौकशी’ ही कोणती नवी पद्धत आणली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. कोणालाही केवळ कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग तपास यंत्रणा कशाला हवी आहे ? त्यांनीच तपास करावा असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले. हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र कोणाला तरी उगाच टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे हेच वाझेंचे वकील; फडणवीसांचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले राजच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे लबाड सरकार आज आम्हाला पहायला मिळालं आहे. महाराष्ट्रच्या इतिहासात ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून लिहिलं जाईल, असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील, असेही ते म्हणाले.