सचिन वाझेंची आणखी एक अलिशान गाडी NIA ने नवी मुंबईतून केली जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत सापडलेली स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांची आणखी एक आलिशान कार NIA ने नवी मुंबईतून मंगळवारी (दि. 30 ) जप्त केली आहे. नवी मुंबईतील कामोठे येथील एका सोसायटीबाहेर ही गाडी उभी होती. ही गाडी वाझे यांच्याच नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

NIA च्या ताब्यात असलेल्या वाझेकडून चौकशीत मिळणाऱ्या माहितीच्या आधारे NIA ने आतापर्यंत 5 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. त्यात मर्सिडीजसह प्राडो या गाडीचाही समावेश आहे. त्यानंतर NIA ने मंगळवारी मित्सुबिशी आऊटलँडर ही आणखी एक आलिशान गाडी जप्त केली. दरम्यान, रविवारी मिठी नदीतून बाहेर काढलेल्या साहित्याचाही NIA ने विस्तृत तपास सुरू केला आहे. वाझे यांनी मिठी नदीत फेकलेला लॅपटॉप डीकोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लॅपटॉप वाझे हे सीआययू कार्यालयातील कामासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार या लॅपटॉपमध्ये नेमकी काय माहिती आहे, त्याचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे, त्यात आणखी कोणी सहभागी आहे का, यासाठी आता लॅपटॉपमधील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.