पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके ‘ऑनलाईन’ मागवली होती, NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राष्ट्रीय तपास पथकाने पुलवामा हल्ला प्रकरणात एक मोठी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या हल्ल्यासाठी ही स्फोटके वापरण्यात आली होती, ती तयार करण्यासाठीचे साहित्य चक्क ऑनलाईन मागविण्यात आले होते. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.

याप्रकरणी जैश ए मोहम्मदचा अतिरेकी शाकीर बशीर मागरे (वय २२) याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाकीर मागरे याने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डार याला रसद पुरविली होती. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे अमोनियम नाईट्रेट, नाइट्रो ग्लिसरीन आणि आरडीएक्स ऑनलाईन खरेदी करण्यात आले होते, अशी माहिती मागरे याने दिली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, बॅटरी आणि अमोनियम नायट्रेट हे मागरे याने ऑनलाईन खरेदी केले होते. जम्मू काश्मीरच्या पुलवामान भागात सीआरपीएफ जवानांचा ताफा जात असताना जैश ए मोहम्मदचा अतिरेकी आदिल अहमद डार याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जवानांच्या बसला धडक देऊन अपघात घडविला होता. त्यामुळे झालेल्या स्फोटात ३९ जवान शहीद झाले होते तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर घडलेल्या या घटनेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी वातावरण तयार झाले. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मद च्या अतिरेक्यांच्या तळावर सर्जिकल स्टाईक केला होता.