होणार मोठा खुलासा ? सचिन वाझेंच्या मोबाईलसह कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे NIA नं केले जप्त !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) सहभागी संशयित मर्सिडीज कार आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी एनआयए नं सीएसटी परिसरातून जप्त केल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययु कार्यालयात शोध मोहिम राबवली. सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या मोबाईलसह कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे एनआयएनं जप्त केले आहेत. अद्याप गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची चौकशी एनआयए कडून करण्यात आली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी एनआयए नं सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणी अनेक नवीन खुलासेही होताना दिसत आहेत.

तपास सुरू असताना एनआयएला हाती लागले अनेक महत्त्वाचे पुरावे

एनआयएला तपास सुरू असताना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात एका इनोव्हा कारची माहिती समोर आल्यानंतर आता एक मर्सिडीज कार जप्त केली आहे. या कारमधून वाझे हे मनसुख हिरेनला भेटले असून त्यावेळी स्कॉर्पिओ कारच्या चाव्या हिरेनकडून घेतल्या असल्याचा एनआयएला संशय आहे. प्रत्यक्षात ही कार चोरी झालीच नव्हती. सूत्रांनी अशी माहिती दिली की, एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फूटेज सापडले आहे. हे सीसीटीव्ही फूटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरेन बसले होते असं समोर आलं आहे.

CCTV फूटेज नुसार, मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पहात होते…

CCTV फूटेज नुसार, मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पहात होते. त्यांतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. ती कार वाझे हेच वापरत असल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची तपासणी केली. त्यात काही शर्ट, पैसे आणि बाटली (ज्यात पाणी अथवा रॉकेल आहे) सापडली आहे. पीपीई किट याच कारमधून नेण्यात आल्याचाही संशय आहे.

शोधमोहिमेत वाझे यांच्या मोबाईलसह कागदोपत्री पुरावे जप्त

सोमवारी रात्री एनआयए च्या अधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालयातील सीआययुच्या कार्यालयात शोध मोहिम राबवली. पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेल्या या शोधमोहिमेत वाझे यांच्या मोबाईलसह कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय वाझे यांच्या इमारतीतील डीव्हीआर जप्त करण्यात आल्याचंही सू्त्रांकडून समजलं आहे.

अद्याप गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची चौकशी

अद्याप एनआयए नं गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची चौकशी केली आहे. यात एक सहाय्यक पोलीस आयुक्त एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन चालकांचा समावेश आहे. त्यातील पोलीस अधिकारी रियाज काजी याची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. या प्रकरणी इनोव्हा कार चालवणाराही पोलीस असल्याचा संशय एनआयएला आहे. त्याचीही चौकशी एनआयए नं केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.