धक्कादायक ! वाझेंच्या घरी सापडले 62 जिवंत काडतुसे अन् बरेच काही…

मुंबई : अँटिलिया स्फोटक आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) या तपास यंत्रणेकडून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामध्ये धक्कादायक माहिती मिळत आहे. सचिन वाझे यांच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडले आहेत.

सचिन वाझे यांना 13 मार्चला अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात एनआयएला सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यानुसार त्यांच्याविरोधात यूएपीएच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली. त्यावर सचिन वाझे यांना विचारले असता त्यांना याबाबत उत्तर देता आले नाही. पोलिस अधिकारी असल्याने त्यांना 30 जिवंत काडतुसे मिळाली होती. मात्र, त्यापैकी फक्त पाचच काडतुसे त्यांच्याकडे मिळाली. बाकीच्या गोळ्या कुठे आहेत? हे विचारल्यावर याबाबतची समाधानकारक माहितीही त्यांना देता आली नाही.

दरम्यान, सचिन वाझे हे तपासात सहकार्य करत नाहीत, असे एनआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. वकिलांच्या दाव्यानंतर न्यायालयाने सचिन वाझे यांना आता 3 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाला काही सांगायचंय : वाझे

अँटिलिया स्फोटक प्रकरणी ‘मला बळीचा बकरा बनवलं जात आहे’, असे सचिन वाझे यांनी सांगितले. तसेच मला न्यायालयाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या असल्याचे म्हटले होते. त्यावर न्यायालयाने तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते सर्व लेखी लिहून द्या, असे निर्देश दिले आहेत.