एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या ‘रडार’वर?, ‘जिलेटीन’ कांड्याबाबत कसून चौकशी सुरु

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुंबई पोलिस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे NIA च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. शर्मां यांची गुरुवारी (दि. 8) सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली आहे. दुपारी 1.15 च्या सुमारास ते NIA च्या ऑफिसमध्ये पोचले असून रात्रीचे 9.30 उलटले तरी चौकशी सुरुच होती. काल बुधवार देखील साडेसात-आठ तास शर्मांची चौकशी सुरु होती. शर्मा यांची सचिन वाझेंच्या केबिनमध्ये मीटिंग झाली होती. त्याबद्दल NIA कडून शर्मांची विचारपूस केली जात आहे. तसेच अंबानीच्या घराबाहेर ठेवलेल्या जिलेटीनबाबत देखील कसून चौकशी केली जात आहे.

NIA ने केलेल्या तपासणीत असे आढळले की सचिन वाझेंनी जिलेटिन खरेदी केली असावी, असे न्यायालयातही म्हटले आहे. अशा परिस्थितीत वाझेंनी प्रदीप शर्मा यांच्यामार्फत जिलेटिनची व्यवस्था केली होती का? याची चौकशी केली जात आहे. तसेच वाझे 3 मार्चला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून अंधेरी परिसरात गेले होते आणि तिथे त्यांनी शर्माची भेट घेतली होती, अशी चर्चा आहे. तसेच अंबानी स्फोटक प्रकरणात ज्या जैश उल हिंद दहशतवादी संघटनेने स्फोटकं ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यासाठी देखील शर्मानी वाझेंना मदत केल्याचा NIA ला संशय आहे.