व्यसनमुक्ततेसाठी निकोटीन रिप्लेसमेंट गम्स, जनौषधी परियोजना 

पोलीसनामा ऑनलाईन – तंबाखूच्या व्यसनाशी लढा देण्यासाठी भारत सरकारने निर्मल हा निकोटीन रिप्लेसमेंट गम प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (पीएमबीजेपी) अंतर्गत आणला आहे. ही एक नावीन्यपूर्ण उपचारपद्धती असून धूम्रपान सोडणाऱ्यांना निकोटीनचे कमी प्रमाण देते. परंतु, त्यासोबत सिगारेटसोबत येणारी इतर घातक आणि कर्करोगाला कारण ठरणारी रसायने देत नाही.

तंबाखू, धूम्रपानचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. जनौषध दिवसाच्या निमित्ताने निर्मलचा प्रसार करण्याबाबत भारत सरकारने हे एक महत्त्वाचे पाऊल राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ नुसार उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उचलले आहे. निर्मल देशभरातील विविध जिल्ह्यांमधील प्रधानमंत्री जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

निकोटीनच्या कमी प्रमाणामुळे धूम्रपान करणाऱ्याला गरजेतून मुक्त होणे, व्यक्तीची इच्छाशक्ती वाढवून सिगारेट सोडण्याशी संबंधित विड्रॉवर लक्षणे कमी करणे आणि बंद करणे, यासाठी मदत होते. तंबाखूचा वापर हे कमी उत्पन्न समाज आणि भारतासारख्या देशांमध्ये आर्थिक विकासामधील मोठ्या अडथळ्यांपैकी एक आहे. त्याच्या गंभीर दुष्परिणामांमध्ये मृत्यू, उत्पादकता कमी होणे आणि आरोग्यसेवेचा मोठा खर्च यांचा समावेश आहे. त्यामुळे कुटुंबे कर्जबाजारी होतात आणि कर्जाच्या विळख्यात अडकतात. भारतातील ८० टक्के धूम्रपान करणारे लोक कमी उत्पन्न कुटुंबांतील असतात आणि देशात सुमारे ३० दशलक्ष धूम्रपान करणारे लोक आहेत.

निर्मल हा निकोटिन गम हा लोकसांख्यिक ताण मोठ्या प्रमाणावर कमी करेल, अशी अपेक्षा आहे. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (एनआरटी) चा मुख्य प्रवाहातील व्यसनमुक्ती अभियानामध्ये समावेश करणे, ही प्रगतीशील आणि स्वागतशील बाब आहे. त्याचा देशाच्या शारीरिक आणि आर्थिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटना एनआरटीला (गम आणि पॅचच्या स्वरूपात) धूम्रपान सोडण्यासाठी एक महत्त्वाचे औषध म्हणून मान्यता देते. परंतु, एनआरटी अद्याप उपचाराचे पहिले स्वरूप म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही.