खेकड्याचे निळे रक्त विकण्यावरून फसवणूक करणारे नायजेरियन गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

खेकड्याचं निळं रक्त विकण्याच्या बहाण्याने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांमध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी, एजजोकू जोएल संडे उर्फ स्टॅनली संडे आणि ओनकांची अँथनी मडू अशी या तिघांची नावे आहेत.

हे तिघे लोकांना फेसबुक आणि मेलवर गिऱ्हाईक म्हणून संपर्क साधून खेकड्याचं निळं रक्त परदेशी औषध कंपन्यांना पाहिजे असल्याची बतावणी करायचे. त्यानंतर विक्रेते म्हणून पुन्हा त्याच लोकांना संपर्क साधत आमच्याकडे स्वस्तात खेकड्याचे निळं रक्त उपलब्ध असल्याचं सांगायचे. या खरेदी विक्रीत फसवणूक झालेल्या लोकांना मोठ्या उत्पन्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून अनामत रकमेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जायचे.

अशाप्रकारे फसवणूक झालेल्या एका इसमाने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास करुन या तिघांना अटक केली. या तिघांकडून दोन महागड्या गाड्या, 37 मोबाईल फोन्स, 21 डेबिट कार्ड्स, 28 चेक बुक, 47 विदेशी घड्याळं असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय आरोपींच्या घरी ब्रँडेड कपड्यांचे दोन हजार जोड आणि ब्रँडेड बुटांचे 200 जोड सापडले आहेत. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांनी अशाप्रकारचे इमेल्स किंवा फेसबुक मेसेजेसना बळी न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केलं आहे.