Night Curfew वर हॉटेल व्यावसायिक नाराज, शिष्टमंडळ थेट CM ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकारच्या विषाणू आढळला आहे. त्यामुळे भारतासह जगातील सर्वच राष्ट्रांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाइट कर्फ्यू) लागू केली आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत राज्यात महापालिका क्षेत्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. हॉटेल सुरू ठेवण्याची रात्री 11 ची वेळ वाढवून ती दीड वाजेपर्यंत करावी, या मागणीसाठी हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे याआधीच हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी व्यवसायाचा काळ असतो. याकाळात हॉटेल्स लवकर बंद ठेवले तर मोठे नुकसान होणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.