Nashik News : नाशिकमध्ये ‘या’ वेळेदरम्यान संचारबंदी लागू, छगन भूजबळांकडून घोषणा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे नाशिक या प्रमुख शहरांसह विदर्भातील शहरांमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरु होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सोमवार (दि.22) पासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदीची घोषणा आज (रविवार) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक मधील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात 534 रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढत असल्याने नाशिकमध्ये ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम कडक करु, असा इशारा देखील भूजबळ यांनी दिला आहे. येथून पुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे भूजबळ यांनी सांगितले.

नाशिकमध्ये वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळा करणाऱ्यांनी पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे आहे. याशिवाय गोरज मुहुर्तावरील लग्न टाळा असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. ज्या दुकानात सॅनिटायझर नसेल त्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. संचारबंदीची घोषणा करताना भुजबळ यांनी शाळा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करुन येत्या आठ दिवस बघून शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असे देखील भूजबळ यांनी सांगितले.