31 डिसेंबरचा बेत फसणार ?, जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. आता नववर्षाच्या स्वागतासाठी शहरांऐवजी ग्रामीण भागात फार्म हाऊस या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी ग्रामीण भागात फार्म हाऊस किंवा अन्य ठिकाणी जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ग्रामीण भागातही संचारबंदी लागू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या सर्वांचीच कोंडी होणार आहे.

बुधवारी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत महसूल आणि पोलीस विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. या बैठकीत चर्चा होऊन काही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘महापालिकांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिक जाण्याची शक्यता आहे. याबाबत आढावा घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत. तो प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ग्रामीण भागातही रात्री ११ ते ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येईल. अभिनव देशमुख ‘शहरातील नागरिक हे प्रामुख्याने ३१ डिसेंबरला ग्रामीण भागात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार संचारबंदीबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे’ असे त्यानी स्पष्ट केले.