रात्रपाळीत काम केल्याने होऊ शकते अकाली रजोनिवृत्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जर्नल ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसारत रात्री काम केल्यानं उद्भवणाऱ्या स्ट्रेसमुळे अकाली रजोनिवृत्ती येऊ शकते. स्ट्रेस हार्मोन्समुळे सेक्स हार्मोन्सवर परिणाम होतो. तसेच महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. जास्त ताण असलेलं काम आणि अनियमित वेळा अकाली रजोनिवृत्तीशी संबंध असल्याचे पुरावे याआधीच्या संशोधनातही मिळाले आहेत.

हेही वाचा – अकाली रजोनिवृत्तीमुळे होऊ शकतात हृदयाचे आजार

रात्रपाळीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. मात्र रात्रपाळीमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो असं संशोधनात समोर आले आहे. संशोधकांनी रात्रपाळीत काम करणाऱ्या ८० हजार नर्सचा सुमारे २२ वर्ष अभ्यास केला. ज्या महिलांनी २० महिने सतत रात्रपाळी केली आहे. त्यांना अकाली रजोनिवृत्तीचा धोका ९ टक्क्यांनी वाढला होता. ज्या महिलांनी २० वर्षांपेक्षा जास्त कधीकधी रात्रपाळी केली आहे, त्यांना अकाली रजोनिवृत्तीचा धोका ७३ टक्क्यांनी वाढला होता. संशोधनाचे अभ्यासक डेव्हिड स्टॉक म्हणाले, ‘ज्या महिलांना ४५ वयाच्या आधी रजोनिवृत्ती येते त्यांच्या कामाची वेळ पाहणं खूप महत्त्वाचं आहे. शरीराच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम, तणाव आणि थकवा यामुळे हा धोका वाढतो असे दिसून आले असले तरी याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा धोका वाढतोच शिवाय हृदयाचे आजार, सांधेदुखी आणि स्मृतीच्या समस्यांचीही शक्यता बळावते, असा निष्कर्ष संशोधकांनी वर्तविला आहे.