मुंबईत ‘नाईट लाईफ’ दिसलेच नाही, पहिल्याच दिवशी ‘फज्जा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर होण्यासाठी येथील प्रमुख व्यवहार हे २४ तास खुले असले पाहिजे, या हेतूने सुरु करण्यात आलेल्या ‘नाईट लाईफ’चा नियोजनाअभावी फज्जा उडाला. मुंबईतील अनिवासी भागात केवळ ४ ते ५ ठिकाणी किरकोळ दुकाने उघडी दिसून आली. मात्र, मॉल, थिएटर्स, दुकाने बंद होती.

मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करावी, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रयत्न करीत होते. मात्र, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर येताच आदित्य ठाकरे यांनी आपली ‘नाईट लाईफ’ची संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुुरु केली. त्यातूनच मुंबई २६ जानेवारीच्या रात्रीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.

यामुळे अनेक उत्साही मुंबईकरांनी मध्यरात्री खरेदी करता येईल, या हेतूने वरळी, दक्षिण मुंबई भागात गर्दी केली होती. पण येथील एकही मॉल रात्री उशिरा उघडी नव्हती. त्यामुळे ग्राहकांची निराशा झाली. जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, बीकेसी, वरळी सी फेस, वांद्रे बँड स्टँड, नरिमन पॉइंटर आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फुड ट्रक म्हणजे वाहनांवरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाणार आहे. तेथे एका ठिकाणी पाच फुड ट्रकला परवानगी दिली जाईल.

ते रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या कोणत्याच ठिकाणी एकही फुड ट्रक आढळून आला नाही. नरिमन पॉइंटर, डायमंड नेकलेस, वरळी सी फेस या भागात रात्री उशिरापर्यंत नागरिक मौजमजा करीत होते. गप्पांचा अड्डा अनेक ठिकाणी जमला होता. मात्र, दीड वाजल्यानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे या सर्व तरुण तरुणींसह उपस्थित असलेल्या सर्वांना हकलून लावले.

त्यामुळे मुंबईत रात्रभर मॉलमध्ये ना काही खरेदी करु शकले. ना कोणतेही हॉटेल, रेस्टॉरंट उघड नव्हते. ‘नाईट लाईफ’ची फक्त घोषणा झाली. पण रात्रभर कोण कोण आपली दुकाने, मॉल उघडी ठेवणार आहे, याची काहीही माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. अथवा तशा सुचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नियोजनाच्या अभावामुळे पहिल्याच दिवशी ‘नाईट लाईफ’ कोठेही दिसले नाही.