निलेश राणे तुम्ही एकदा बारामतीला या ! अजित पवारांवरील टीकेला थेट बारामतीमधून प्रत्युत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राणे पिता-पुत्र विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विविध मुद्यांवरुन ते राज्यातील महाविकास आघाडीमधील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधत असतात. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टीकेला थेट बारामतीमधून (Baramati) प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांना बारामती भेटीचे ‘ठरवून’ आमंत्रण देण्यात आले आहे.

बारामती शहर युवक काँग्रेसने निलेश राणे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, अजित पवारांनी केलेली विकासकामे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सद्य पहायला बारामतीत जरुर या असे थेट आव्हानच दिले आहे. या आमंत्रणाला निलेश राणे कशा पद्धतीने उत्तर देतात हे पहावे लागले.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर मासाळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व तुमचे भाऊ नितेश राणे यांनी देखील वारंवार बारामतीच्या विकास कामाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आधी बारामतीतील विकास कामांची त्यांच्याकडून महिती घ्या आणि नंतर बरळत चला अशा खरमरीत शब्दांत त्यांनी निलेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे ?

निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती, अजित पवार यांना आज जो काही मान आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे आहे. बारामतीत आजदेखील शरद पवार यांचीच पूर्णपणे ताकद असल्याचे दिसते. तशी अजित पवारांची काहीही ताकद बारामतीत नाही. ते स्वबळावर ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निवडून आणू शकत नाहीत.