निवडणूक लढवायला हिंमत लागते, निलेश राणेची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर पक्षाने विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेने केली. यावर निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. निवडणूक ‘लढवायला हिंमत लागते. विजय किंवा पराभव होत असतो पण दुस-यांच्या लाटेवर निवडून येणारे फक्त तिकीट वाटप करू शकतात’ असे ट्विट निलेश राणे करून टीका केली आहे.

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली होती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांच्यासाठी उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील दिग्गज नेत्यांची मुले राजकारणात येत आहेत. अजित पवार यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन राजकारणात आणले. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे राजकारणात प्रवेश करून विधानसभा लढवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.