नाव खराब झाल्यामुळे मनसे पक्ष कोसळला : नीलेश राणे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षामध्ये शिस्त ही महत्त्वाची असते. ही पक्षशिस्त एका साध्या कार्यकर्त्यापासून ते नेत्यापर्यंत सर्वांनीच पाळायची असते. शिस्त नाही पाळली तर काय होते हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघितल्यानंतर कळते. मनसेचे नाव खराब झाल्यामुळे तो पक्ष कोसळला आहे आणि आता तो उभा राहू शकत नाही. त्यामुळे शिस्तीला प्राधान्य द्या, असे आवाहन कार्यकर्त्याना माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. येथील इंदिरासागर हॉलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

राणे म्हणाले की, आजपर्यंत राज्यात व केंद्रात अनेक पक्ष सत्तेवर आले आणि गेले. त्यापैकी काही पक्षांनी कार्यकर्त्यांवर, जनतेवर जुगार खेळून पक्षाची वाढ केली; परंतु महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मात्र कार्यकर्त्यांवर जुगार खेळणार नाही, तर जनतेच्या कामासाठी या पक्षाची स्थापना केली. स्वाभिमान पक्षात नेत्यांनी स्वत: शिस्त पाळावी, कार्यकर्त्यांनाही शिस्त पाळण्यास सांगावे.

आज आमच्या पक्षाची सत्ता नाही ; मात्र तरीही जनतेच्या हितासाठी या पक्षाची स्थापना झाल्यामुळे आम्ही सामाजिक कार्यातून पक्ष उभा करत आहे. त्यामुळेच आमच्या पक्षाची सत्ता नसतानाही दररोज शेकडो कार्यकर्ते आम्हाला पाठिंबा देत आहेत. समाजात काम करत असताना अनेक वर्षे संघर्षात घालवावी लागतात. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी अगोदर सामाजिक कार्यातून स्वत:ची ओळख निर्माण करून पक्षात सक्रिय व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी राणे यांनी शिवसेनेवर टीका करताना चाळीस वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये शिस्त होती, त्यावेळी साहेबांचे आदेश मानले जायचे ; परंतु आता या पक्षात ती शिस्त राहिलेली नाही, त्यामुळे पक्षही बिघडत चालला आहे. पूर्वीची शिवसेना आता राहिली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.