निलेश राणेंची अनिल परब यांच्यावर टीका,’म्हणाले – ‘… तर अनेकांचे जीव वाचले असते’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महारष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी जिल्हा अनाथ असल्यासारखा पालकमंत्र्यांची तीन तीन महिने वाट पहात आहे. मात्र, तो रत्नागिरीचा पालकमंत्री मुंबईत स्वत:चं 1000 फुटांचे अनधिकृत ऑफिस वाचवण्यासाठी मंत्रीपदाचा वापर करतोय. जी जिद्द ऑफिस वाचवण्यासाठी वापरली ती जिल्ह्यासाठी वापरली असती तर कदाचित अनेकांचे प्राण वाचले असते, असे खडेबोल निलेश राणे यांनी अनिल परब यांना सुनावले आहेत.

निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये विकास कामे वेगाने होत असताना रत्नगिरी जिल्हा मात्र दिवाळखोरीत गेला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आम्हाला वाली कोण आहे असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णांना ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेना एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना शिवसेनेचे नेते झोपी गेले आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री कोण ? हे जिल्ह्याला माहित नाही. पालकमंत्री अनिल परब यांना ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नाही तर सेनेचे मंत्री जिल्ह्याचा विकास काय करणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

रत्नागिरी जिल्हा आज मृत्यूच्या दाढेत असताना कोरोना होण्याच्या भीतीने शिवसेनेचे मंत्री मतदारसंघात फिरकायला तयार नाहीत. अनिल परब हे मंत्रीपदाचा वापर करुन खंडणी वसूल करण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी कवडीची देखील मदत करताना दिसत नाहीत. पालकमंत्र्यांना ड्रायव्हर मिळत नाही आणि ग्रामीण भागात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अ‍ॅब्यूलन्स मिळत नाही. रुग्णांना खासगी वाहनातून रुग्णालयात न्यावे लागत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजन कमी पडत असताना आठ महिने झाले तरी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टला मुहूर्त मिळेना. तारीख पे तारीख देऊन नव्या प्लॅन्टची घोषणा करतात. रुग्ण मेल्यावर पालकमंत्री जिल्ह्याला आरोग्य सेवा पुरवणार आहेत का, असा संतप्त सवाल निलेश राणे यांनी केला आहे.