देवेंद्र फडणवीस यांचं ’पहाटेचं सरकार’ पुन्हा चर्चेत ! नीलेश राणेंचं ’हे’ ट्विट राष्ट्रवादीला झोंबले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  भारतीय जनता पक्षाने काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे. त्यातील एक कंत्राटदार नीलेश राणे हे आहेत. त्यांनी आता जे वक्तव्य केलंय त्याला राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार केलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नीलेश राणे यांनी टीका केलीय. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ’भारतीय जनता पक्षाने लोकांच्या आणि शेतकर्‍यांच्या जीवाची होळी केलीय. देशाची अर्थव्यवस्था लयाला नेलीय. याकडे लक्ष जावू नये, म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिलाय. निलेश राणे हे त्यातील एक आहेत’, असा थेट हल्ला तपासे यांनी केलाय.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं पहाटेचं सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी प्रयत्नशील होते, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखामध्ये केला आहे. ’पहाटेचे मुख्यमंत्री’ देवेंद्र फडणवीस यांची मर्जी राखण्यासाठी गुप्तचर खातं काम करत होतं, असा दावाही केलाय. या दाव्यामुळे ठिगणी पडलीय. भाजपकडून नीलेश राणे यांनी यात उडी घेत शिवसेनेचा समाचार घेतल्याशिवाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही शरसंधान केले. नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधलाय.

 

’शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या शपथविधीवर टीका करते. मग, अजित पवार पहाटे राजभवनावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनी केलाय’, असे खोचक ट्विट नीलेश राणे यांनी केलंय. निलेश राणे यांच्या याच ट्विटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड भाषेत त्याला प्रत्युत्तर दिलंय.

महाराष्ट्र राज्यातील काही पोलीस अधिकार्‍यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, याची बातमी कालच एका दैनिकाने दिलीय. मात्र, अनिल देशमुख यांनी पुण्यामध्ये बोलताना त्याचा इन्कार केला होता. अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ’एका दैनिकाने माझे वक्तव्य म्हणून जी दिलीय, ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलो नाही. या मुलाखतीचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध असून आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल’, असे देशमुख म्हणाले होते. त्यानंतर दैनिक ‘सामना’च्या दाव्याने पाडापाडीचा विषय आज दिवसभर चर्चेत राहिलाय.