‘जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत’ : निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर अडचणी निर्माण होत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात कारवाई केली आहे, तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कारासारखा गंभीर आरोप लावला आहे. या दोन्ही प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गोत्यात सापडल्याचं चित्र आहे. यातच स्वतः शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर असल्याचं सांगितलं आहे.

नवाब मलिक यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप नसून पण त्यांच्या जावयाला अटक केली म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी चुकीची आहे. नवाब मलिकांनी स्वत: या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत गुन्हेगार कोणीही असो शिक्षा होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिकांना शरद पवारांनी क्लीनचिट दिली आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप आहे. याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे शरद पवार यांनी म्हटले होते. काल रात्री उशिरा या बाबत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, त्यामध्ये तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी सखोल चौकशी होऊ द्या, मग पुढे निर्णय घेऊ असं सांगत राजीनामा घेणार नसल्याचं बैठकीत स्पष्ट झालं आहे.

परंतु राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या या आरोपामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केलीं आहे. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यामुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्सच्या प्रकरणात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला लगावत, निलेश राणेंनी ट्विट केलं आहे. तसेच विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवार भेटीवरही निलेश राणेंनी बोलले आहे. की मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या प्रकरणासाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? असा प्रश्न उपस्थित करत हे प्रकरण झाकायच धोरण दिसतंय. यामुळे पोलिसांवर लोकांचा विश्वास उडेल, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का? हे पण आयुक्तांनी सांगावं अशी सडकून टीका निलेश राणेंनी केली आहे.