निलेश राणेंचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांवर निशाणा, म्हणाले – ‘जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?’ (व्हिडीओ)

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन –   सीबीआयने काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर छापा टाकून झडती घेतली. सीबीआयने कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला आहे. जयंत पाटील यांच्या आरोपावर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार पलटवार करत घणाघाती टीका केली आहे.

निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांच्या आरोपाचा समचार घेतला. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का ? ज्याचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत, ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा त्या घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं, घरात कोण जातं आणि कोण येतं हे फक्त वॉचमनच सांगू शकतो, त्यामुळे जयंत पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घराचे वॉचमन असावेत, असा टोला निलेश राणे यांनी लावला.

आता ते व्हिलन झाले का ?

निलेश राणे यांनी पुढे म्हणाले. जयंत पाटील यांनी डोकं लावून बोलावं. तुम्हाला असे बोलणे शोभत नाही, असे सांगताना परमबीर सिंग यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते व्हिलन झाले आहेत का ? असा सवाल निलेश राणे यांनी विचारला आहे.

तुमचे हात साफ असतील तर सुटाल

अनिल देशमुख यांची चौकशी व्हावी हे न्यायालयाला वाटले. त्यामुळेच न्यायालायने सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यात महाविकास आघाडीच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असे सांगताना राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही. उद्या आपलंही नाव येईल म्हणून राष्ट्रवादीवाले बिथरले आहेत. चौकशी झाली तर कुठपर्यंत नाव जातील याची त्यांना भीती वाटतेय. त्यामुळे राष्ट्रवादीला चौकशी होऊ नये असे वाटत आहे, असा दावा राणे यांनी केला.

इतरांची नावं बाहेर येण्याची भीती

राज्यात सीबीआयला प्रवेश न करु देणारं महाराष्ट्र हे पश्चिम बंगालनंतरचे दुसरे राज्य आहे. आता तर न्यायालयानेच सीबीआयला राज्यात पाठवलं आहे. न्यायालय ही काय भाजपची एजन्सी आहे क ? असा सवाल करताना या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. हा कोर्टाचा अधिकार असून त्यात केंद्राचा हस्तक्षेप नाही. इतरांचीही नावं या चौकशीतून बाहेर येण्याची भीती असल्यानेच हा खेळ सुरु आहे. आता खरी नावं बाहेर येतील. आरोपी पकडले जातील. आता त्यांना कोणी वाचवू शकणार नाही, असा दावाही निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

अनिल परब मातोश्रीचे एजंट

पत्रकार परिषदेमध्ये निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. अनिल परब हे मातोश्रीचे एजंट असून ते या गुन्ह्यात भागीदार आहेत. परब मातोश्रीवर पैसे पोहोचवत होते. मातोश्री सुद्धा या गुन्ह्यात असून परब हे पाईपलाईनमध्ये असल्याचे सांगत ते आता सुटू शकत नाहीत, असेही निलेश राणे यांनी सांगितले.