निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  तौत्के चक्रीवादळाचा मुंबईसह शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतला एक व्हिडिओ शेअर करून थेट पर्यावरण मंत्री अन् मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तौत्के चक्रीवादळानंतरचा वरळीमधला एक व्हिडिओ निलेश राणे यांनी ट्वीट केला असून त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. हे चित्र वरळी मतदारसंघाचे आहे. वरळीकर विचारतायत तो केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसले. सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही अशा शब्दात राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

निलेश राणे यांनी तौत्के चक्रीवादळानंतरचा वरळीमधील शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यातून वाट काढत असल्याचे दिसत आहे. चिंचोळ्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. पावसाळ्यामध्ये मुंबईत साचणार पाणी, तुंबणारे नाले आणि लोकांची होणारी ससेहोलपट हे चित्र दरवर्षी दिसत होते. मात्र यंदा ऐन उन्हाळ्यात चक्रीवादळामुळे पाणी साचल्याच दिसले आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी टीका केली आहे. दरम्यान, निलेश राणे यांच्याप्रमाणेच त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारकडून कोकणाला दिलेल्या मदतनिधीवरून निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी कोकणाला तडाखा बसलेल्या चक्री वादळानंतर राज्य सरकारने जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्षात असलेली परिस्थिती, याविषयी त्यांनी ट्वीटमध्ये आक्षेप घेतला आहे. हे बघा ठाकरे सरकारच कोकणावर किती प्रेम, इतक प्रेम कधीच कोणी केले नाही कोकणावर. आता ही भरभरून देतील बघा. आभार @CMOMaharashtra असे म्हटले आहे.