‘ओवाळणी’च्या पैशावरुन पुजाऱ्यांमध्ये ‘तुंबळ’ हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निमगाव खंडोबा येथे खंडोबा मंदिरातील ओवाळणी केलेल्या पैशांच्या वाटपावरून वाद होऊन त्यात दोन पुजाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. देवापुढील पैशांवरुन पुजाऱ्यामध्ये नेहमीच वाद होत असतात. पण, खेड पोलिसांकडे या पुजाऱ्यांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

सोमवती अमावास्या असल्यामुळे निमगाव खंडोबा येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. निमगाव खंडोबा हे देवस्थान ट्रस्ट आहे. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या खंडोबा देवाच्या पिंडीवर भाविक श्रद्धापूर्वक पैसे आणि इतर वस्तू देवासाठी ठेवतात. त्यावर पुजाऱ्यांचा हक्क आहे. देवापुढे ठेवलेले पैसे, वस्तू मंदिरातील पुजारी नंतर त्याच्यात आपापसात वाटणी करून घेतात. ही येथील प्रथा आहे.

सोमवती अमावास्या संपल्यानंतर रात्री देवाला ओवाळणी केलेल्या पैशांची व वस्तूंची वाटणी करण्यासाठी सगळे बसले होते. पैसे वाटपावरून भगवान रामभाऊ गुरव (वय ६८), गणेश भगवान गुरव (वय ४२), कविता दत्तात्रय गुरव (वय ४०), वैभव दत्तात्रय गुरव (वय २१, सर्व रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) यांना नानाभाऊ धोंडिबा भगत (वय ४५), रोहित नानाभाऊ भगत (वय १८), रवींद्र भीमाजी भगत (वय २६, सर्व रा. निमगाव खंडोबा) यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कविता भगत या महिलेस धक्काबुक्की केली. याबाबत दोन्ही पुजाऱ्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.