Advt.

पतंजलीसह बाबा रामदेव यांना मोठा झटका ! निम्सचे डॉक्टर पलटले, जाणून घ्या नेमकं काय झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनावर पतंजलीने कोरोनिल हे औषध लाँच केल्यानंतर हे औषध वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या औषधामुळे योगगुरू रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारांनी या औषधावर प्रश्न उपस्थित केले. आता, ज्या डॉक्टरांच्या मदतीने पतंजलीने जयपूरच्या निम्स रुग्णालयात या औषधाची क्लिनिकल चाचणी केली असे सांगितले होते, तेच डॉक्टर आता पलटले आहेत. तसेच निम्सचे अध्यक्ष बी.एस. तोमर यांनी सांगितले की, आमच्या रुग्णालयात कोरोनिल औषधाचं ट्रायल करण्यात आले नसून केवळ आयुर्वेदिक औषध कोरोना रूग्णांना देण्यात आले आहे. बी.एस. तोमर म्हणाले, ‘आमच्या रूग्णालयात कोणत्याही कोरोना औषधाची चाचणी घेण्यात आलेली नाही.

कोरोना रूग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी आम्ही अवश्वगंधा, तुळस आणि गुळवेल दिले होते. रामदेव बाबांनी याला 100 टक्के कोरोनावर उपचार करणारे औषध कसे म्हटले याबाबत आम्हाला काहीही माहित नाही. याबद्दल केवळ रामदेव बाबाच सांगू शकतात.’ खासकरुन, निम्सने सीटीआरआय (Clinical Trials Registry India – CTRI) कडे 20 मे रोजी औषधाच्या प्रतिकारशक्ती चाचणीसाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर निम्समध्ये औषधाची चाचणी घेण्यात आली. 23 मे रोजी चाचणी सुरू झाल्यानंतर एक महिन्यानंतर 23 जून रोजी रामदेव बाबांकडून हे औषध लाँच करण्यात आले होते आणि आता निम्सचे चेअरमन म्हणाले की या चाचणीचा परिणाम दोन दिवसांपूर्वी समोर आला आहे. कोरोनिल औषध बाबा रामदेव यांनी कसे बनवले, आम्हाला त्याबद्दल कसलीही माहिती नाही.

आयुष मंत्रालयाने कोरोनिल औषध लाँच होताच पतंजलीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आणि या औषधाबद्दल सविस्तर माहिती देण्यास सांगितले. औषधांची जाहिरात थांबविण्याचे आदेश तोपर्यंत दिले गेले होते. यानंतर पतंजलीला उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाने नोटीस देखील बजावली होती. खोकला-ताप औषधासाठी परवाना मिळाला होता, कोरोना औषधासाठी परवाना हा मिळालाच कसा याबाबत विचारणा देखील करण्यात आली. दरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात बिहारच्या मुजफ्फरपुरात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच या औषध विक्रीवर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे.