‘असा’ आहे बाळासाहेब ठाकरेंचा 9 फुटांचा पूर्णाकृती पुतळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत 9 फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील चौकात उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री येथे बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली. बाळासाहेबांचा हा पुतळा ब्राँझचा असून याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बाळासाहेबांचा पुतळा पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

बाळासाहेबांच्या 9 फूटी ब्राँझचा पुतळा कलानगर येथील प्रसिद्ध वास्तूशिल्पकार शशिकांत वडके यांनी साकारला आहे. हा पुतळा साकारत असताना त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभेला आल्यावर जनसमुदायाला संबोधतानाचे भाव आणणं हे सर्वात मोठं कठीण काम असल्याचे वडके यांनी सांगितले. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तीमत्त्व आहेत. त्यामुळे त्यांची हुबेहुब मूर्ती करणे हे एक आव्हान होतं, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी करून काही तांत्रिक गोष्टीच्या सूचना दिल्याचेही वडके यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा जवळील महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा 9 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी 2 फूट उंच हिरवळीसह 11 फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे. बाळासाहेबांची येत्या 23 जानेवारीला 94 वी जयंती आहे. त्याच दिवशी पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले जात आहे.

बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेचे स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी गटनेत्यांच्या बैटकीत मांडला. या प्रस्तावाला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊ पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. मुंबई अर्बन आर्टसं कमिशन यांच्याकडून अद्याप पुतळा बसवण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकारच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.