Nagpur News : 10 दिवसात 9 पोलीस अधिकारी अन् कर्मचारी निलंबित, पोलीस दलात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या दहा दिवसांत नागपूरात 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विविध प्रकरणात निलंबन केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या शहरात पोलिसांचे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लकडगंज झोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील ओल्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश लाडे, हेडकॉन्टेबल रत्नाकर मेश्राम आणि प्रदीप राव या तिघांना निलंबित केले आहे. त्यानंतर गोरेवाडा भागात जखमी अवस्थेत सापडलेल्या वृद्ध भैय्यालाल बैस यांना वेळीच मदत न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मानकापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह एकूण चौघे निलंबित केले आहे. तर ठाण्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर खंडणी वसूल केल्याचा आरोप लागलेले एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. या सर्व प्रकरणामुळे नागपूर पोलिसांची प्रतीमा मलिन झाली आहे.