Coronavirus : सोलापूरमधील ‘त्या’ 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील 9 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तात्काळ क्वरांटाईन करण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्याच संपर्कातील आणखी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज (रविवार) दिली. तर शहरातील 3 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी 22 मार्चपासून राज्यातील पोलीस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरी देखील अनेक लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. सोलापूर शहर हद्दीत आठ ठिकाणी तर शहरां अंतर्गत सात ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जेणेकरून विनाकारण कोणीही पर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येणार नाही, याची विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहेत. तरी देखील ग्रामीण पोलीस दलातील 13 तर शहर पोलीस दलातील 3 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहेत. त्यांच्या संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

संपर्कातील कर्मचारी आणि इतर व्यक्तींचा शोध सुरु
शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 80 ते 90 जण आल्याचा अंदाज आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील या नऊ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात नेमके किती पोलीस आणि अधिकारी आले याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, ग्रामीण पोलीस दलातील कोरोना पॉझिटिव्ह चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील 68 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी 48 कर्मचारी आयसोलेशन वॉर्डमध्ये तर 20 कर्मचारी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी 55 वर्षावरील 14 पोलीस अधिकारी व 138 कर्मचाऱ्यांना घरीत राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सोलापूर ग्रामीणमधील आहेत.