भुजबळांचा मोदी सरकारवर आरोप, म्हणाले – ‘देशात गंभीर परिस्थिती असताना 9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात सध्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. ऑक्सिजनचा साठा संपल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवावे लागत आहे. देशात एवढी भीषण परिस्थिती असताना भारतातून 9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन भारतातून परदेशात पाठवला जात असेल तर हे गंभीर आहे. लस निर्मितीसाठी कच्चा माल देण्याआधी अमेरिका प्रथम आपल्या जनतेचा विचार करत आहे आणि आपण मात्र परदेशात वाटप करत सुटलो आहोत, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यावर बोट ठेवत भुजबळ यांनी निशाणा साधला. गेले काही दिवस कुणी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त होते. तर कुणी कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यानंतर कोरोना संसर्गाचा मोठा स्फोट होणार हे निश्चित होते, आणि तेच चित्र आज देशात दिसत असल्याचे भुजबळ म्हणाले. नाशिक जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नियमितपणे संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दररोज सकाळी ऑक्सिजनच्या स्थितीबाबत आढावा घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, विशाखापट्टणम येथून आलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज सकाळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. एकूण 4 टँकर येथे उतरवण्यात आले असून त्यातील 2 टँकर नाशिकला मिळाले आहेत तर 2 नगर जिल्ह्यासाठी रवाना केले आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.