केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरस पुन्हा परतला ; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा यांनी एक रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. २०१८ मध्येही निपाह व्हायरसमुळे केरळात १६ जणांचा मृत्यू झाला होता.

एर्नाकुलम येथे राहणाऱ्या तरुणाला निपाहची लागण झाल्याची महिती आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी दिली आहे. पुण्यातील व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटमध्ये करण्यात आलेली त्याची रक्तचाचणी दोषी आढळली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही ताप आला असून त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे.

तसेच राज्यभरात ८६ संशयित रुग्ण दाखल झाले असून या रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. एर्नाकुलम मेडिकल कॉलेजने या रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार केला आहे. या सर्व रुग्णांना निपाह विषाणूची बाधा झाल्याचा संशय असून वैद्यकीय अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

निपाह व्हायरसबद्दल –

१९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले.या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते.हा व्हायरस वटवाघूळात असतो.
२००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.

व्हायरसची लक्षणे –

हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.
हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात.
इंफेक्शनच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यास त्रास होणे.
३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.
२४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.
न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.
अंगदुखी.

ही काळजी घ्या –

खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.
या व्हायरसने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.
सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, उपलब्ध नाही.
पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.