नीरा खोऱ्यातील धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १५ टक्यानी कमी पाणीसाठा

१ एप्रिलला नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुटणार

पुुुरंदर : पोलीसनामा आँनलाईन – नीरा खोऱ्यातील धरण परिसरात जून २०१८ मध्ये पाऊस लवकर न पडल्यामुळे खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागत आहे. तसेच धरणाच्या लाभक्षेत्रात समाधनकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने नीरा खोऱ्यातील धरणांत शुक्रवारी २९ मार्च अखेर गतवर्षा पेक्षा सरासरी १५ टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. याचा परिणाम रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकाना द्यावयाच्या पाण्यावर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना एक उन्हाळी आवर्तन कमी मिळणार असल्याची माहिती समजते.

खरीपाची पिके ही पावसाच्या पाण्यावर येत असतात. परंतु, जून२०१८ मध्ये पाऊस न पडता तो सप्टेंबरच्या शेवटी झाला. तसेच परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप व रब्बी पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. याचा परिणाम सध्या चालू असलेल्या उन्हाळी पिकांना जाणवणार आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन ४५ दिवस चालू राहणार आहे.

शुक्रवारी २९ मार्च अखेर नीरा खोऱ्यातील वीर धरणामध्ये ४६०३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच ४८.९३ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी ५८०८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६१.७३ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. तसेच भाटघर धरणामध्ये ९३४१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ३९.७५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी १३६५४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५८.१० टक्के पाणी साठा उपलब्ध होता. नीरा देवघर धरणाची ३०७५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच २६.२२ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी ४८५३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ४१.३८ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणामधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षा पेक्षा आकडेवारीवरून चिंताजनक असल्याचे जाणवत आहे.

दरम्यान, नीरा उजवा कालव्याचे पिण्यासाठी व शेतीसाठी उन्हाळी अवर्तन ११ मार्चला सुरु झाले आहे. तो साधारण ७५ दिवस चालू राहणार असून याचा लाभ खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यातील जवळपास सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्राला होत आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन १ एप्रिलपासून सुरु होणार असून या पाण्याचा लाभ पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यातील जवळ पास ६५ हजार हेक्टर क्षेत्राला होत असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

याबाबत नीरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे म्हणाले की, नीरा खोऱ्यातील धरणक्षेञात उशिरा पाऊस झाल्याने खरीप, रब्बी पिकांना बऱ्यापैकी पाणी कालव्याद्वारे द्यावे लागल्याने याचा परिणाम उन्हाळी आवर्तनाला लागणाऱ्या पाण्यावर होत आहे . त्यामुळे यावर्षी नीरा डावा कालव्याचे आवर्तन ४५ दिवस चालू राहणार आहे.