नीरा देवघर धरण ‘ओव्हरफ्लो’ तर गुंजवणी धरणात 98.17 % पाणी साठा

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन – नीरा खो-यातील नीरा देवघर धरण सोमवारी (दि.२४) ओव्हरफ्लो झाले असून गुंजवणी धरण ९८.१७ टक्के भरून शंभरीकडे वाटचाल करीत आहे. तर भाटघर व वीर धरण गुरूवारी ( दि.२०) रोजीच १०० टक्के भरले आहे. दरम्यान, नीरा देवघर धरणातून संध्याकाळी ४ हजार ५०२ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती नीरा देवघर धरणाचे सहाय्यक अभियंता परमानंद गोसावी यांनी दिली.

या हंगामात नीरा देवघर धरण १०० टक्के पुर्ण क्षमतेने भरल्याने सोमवारी (दि.२४) संध्याकाळी धरणाच्या पाण्याचे जलपुजन उपअभियंता अशोक चव्हाण, नीरा देवघर धरणाचे सहाय्यक अभियंता परमानंद गोसावी, भाटघर धरणाचे सहाय्यक अभियंता अनिल नलावडे, संदेशक सर्जेराव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धरणातून विसर्ग सोडण्यात आला.

नीरा देवघर धरण सोमवारी (दि.२४) पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणांत ११.७२९ टि.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात सोमवारी दिवसभरात ११ मि.मी. पाऊस पडल्याने नीरा देवघर धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने धरणातून सोमवारी संध्याकाळी सहा वाजता धरणाच्या तीन दरवाजातून ३ हजार ५०२ क्युसेक्स व धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून ७५० क्युसेक्सने ४ हजार २५२ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.

भाटघर धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणात २३.५०२ टि.एम.सी.पाणीसाठा झाला आहे. धरणातून सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पाच वाजता ४ हजार९०० क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. दिवसभरात धरण परिसरात २ मि.मी.पाऊस पडला आहे.

वीर धरण पुर्ण क्षमतेने १०० टक्के भरलेले असून धरणांत ९.४०८ टि.एम.सी.पाणीसाठा उपलब्ध आहे. वीर धरणात येणाऱ्या पावसाचे पाणी तसेच भाटघर, गुंजवणी धरणातून येणारे पाणी यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणामधून सोमवारी (दि.२४) पहाटे ३.३० वाजता १८ हजार ५४८ क्युसेक्स व संध्याकाळी विसर्गामध्ये कपात करून १३ हजार ९११ क्युसेक्सने व वीज निर्मिती केंद्रातून ८०० क्युसेक्स असे १४ हजार ७११ क्युसेक्सने नीरा नदीत विसर्ग सुरू होता.

गुंजवणी धरण परिसरात सोमवारी (दि.२४) दिवसभरात ११ मि.मी. पाऊस पडल्याने धरणात ३.६२२ टि.एम.सी.पाणी साठा उपलब्ध असून धरण ९८.१७ टक्के भरून शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

दरम्यान, नीरा नदीपात्रात वीर धरणामधून १४ हजार ७११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे वीर धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदी काठच्या रहिवांशाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.