नीरेत गुरुवारपासून झंकार व्याख्यानमाला

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – येथे लोकनायक प्रतिष्ठाणच्या वतीने दि. ६ ते दि.१० फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय झंकार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा लोकनायक पुरस्कार पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांना; तर स्व. अक्षय भोसले क्रीडा पुरस्कार एअर पिस्टल शुटर (नॅशनल) शिवानी प्रशांत सातव हिला देण्यात येणार असल्याची माहिती झंकार व्याख्यानमालेचे प्रमुख संयोजक प्रा. व. बा. बोधे यांनी दिली.

व्याख्यानमालेचे यंंदाचेे ३४ वे वर्ष आहे. गुरूवारी ( दि.६) रोजी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देेेशपांडे, सातारा या ‘लेक लाडकी या घरची’ या विषयावर, शुक्रवारी (दि.७) रोजी पुणे येथील प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी हे “काश्मिर आणि आम्ही” या विषयावर, शनिवारी (दि. ८) खोपोली नगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी जयश्री धायगुडे या “राजश्री शाहू महाराज” या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. रविवारी (दि.९) महाड येथील डॉ. शितल मालुसरे या “नरवीर तानाजी मालुसरे आणि शिवशाही” या विषयावर तर सोमवारी (दि. १०) रोजी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा.व. बा. बोधे यांचे ‘थोरांच्या सहधर्मचारिणी ‘ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहेत.

या वर्षीचा लोकनायक पुरस्कार सोमवारी (दि. १०) पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपट्टू स्व.अक्षय भोसले क्रिडा पुरस्कार एअर पिस्टल शुटर (नॅशनल) शिवानी प्रशांत सातव हिला देण्यात येणार आहे.

दरम्यान, नीरा येथील कै. बाबालाल काकडे यांच्या बंगल्यासमोरील प्रांगणात दररोज संध्याकाळी सात वाजता व्याख्यानमाला होणार असून नीरा व परिसरातील श्रोते, तरूण तसेच महिलांनी बहुुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक नाना जोशी यांनी केले आहे.