परतीच्या पावसामुळे नीरा नदीला पूर ; नीरेतील डोंबारी वस्तीत व स्मशानभूमीत शिरलं पाणी

पुणे : (नीरा) पोलिसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) –  वीर धरणातून मंगळवारी (दि.२२) सकाळी सहा वाजता नऊ दरवाजातून ५४ हजार ४७४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे नीरा नदीला आलेल्या पुरामुळे नीरा (ता.पुरंदर) येथील नदीकाठी असलेल्या डोंबारी वस्तीत व स्मशानभूमीत मंगळवारी (दि.२२) सकाळी पाणी शिरलं. तर नीरा नदीवरील ब्रिटीश कालीन पुल, प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले. दरम्यान, नीरा नदीकाठच्या रहिवाशांना वीर धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भाटघर धरण परिसरात मंगळवारी (दि.२२)
पहाटे दोन ते पाच वाजण्याच्या सुुमारास मुसळधार परतीचा पाऊस पडला. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने वीर धरण पुुुन्हा १०० टक्के भरल्याने वीर धरणातून मंगळवारी (दि.२२) पहाटे साडेतीन वाजता १३ हजार ६०८ क्युसेक्स, सव्वा चार वाजता २३ हजार ६०९ क्युसेक्स, पाऊणे पाच वाजता ३३ हजार क्युसेक्स, सव्वापाच वाजता ४२ हजार ३६० क्युसेक्स असा टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर पाणी पातळीत वाढ होत झाल्याने सकाळी सहा वाजता वीर धरणाच्या सर्व नऊ दरवाजातून ५४ हजार ४७४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे नीरा नदीला पूर आल्याने नीरेतील नदीकाठी असलेल्या डोंबारी वस्तीत मंगळवारी (दि.२२) सकाळी पाणी शिरल्याने तेथील रहिवाशी जुन्या मराठी शाळेत स्थलांतरित झाले आहेत. मात्र त्यांना शासकीय यंत्रणेकडून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचे समजते.

तसेच नीरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली गेल्याने नीरेतील स्मशानभूमीतही पाणी शिरलं. तसेच नीरा परिसरातील पाडेगांव (ता.खंडाळा) येथील सरहद्देच्या पुलावरील ओढ्याला पाणी आल्याने पाडेगांव फार्म ते नीरा वाहतूक बंद होती. तसेच नदीकाठच्या शेतीतही पाणी शिरले होते. दरम्यान, भाटघर धरण परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत १२१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

वीर धरणातून ५४ हजार ४७४ क्युसेक्सने सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग दुपारी बारा वाजता कमी करून तो ४२ हजार क्युसेक्स पर्यंत कमी करण्यात आला. तसेच दुपारी चार वाजता विसर्गात कमी करून पाच दरवाजातून २२ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

भाटघर धरण परिसरात पहाटे दोन ते पाच वाजण्याच्या सुमारास जवळपास १०० मि.मी.पाऊस
झाल्यामुळे वीर धरणाच्या नऊ दरवाजातून ५४ हजार ४७४ क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले
असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.

नीरा येथेही गेल्या तीन -चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु होता. सोमवारी पाऊसाने दिवसभर उघडीप दिली. परंतू रात्री आठ वाजल्यानंतर पुन्हा पावसाने सुरूवात केली. तर मंगळवारी ( दि.२२) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तासभर धो…धो. पाऊस पडला तर कधी रिमझिम पाऊस पडत होता.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like