नीरा : कामठवाडी जवळील अपघातात 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर वाल्हे गावच्या हद्दीत कामठवाडी जवळ शनिवारी (दि. २८) सायं. ७ वा. सुमारास जेजुरीहून नीरेकडे भरधाव वेगात निघालेल्या कार ने समोरून येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोन जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ( दि.२७ ) सायं.७ वा. सुमारास ऊसतोड कामगार आदिनाथ विक्रम सोनवणे ( रा.चकलांबा ता.गेवराई ) गजानन भाऊसाहेब थोरे ( रा.केकत जळगाव ता.पैठण ) व बाळू भानुदास सानप ( रा.चकलांबा ता.गेवराई जि.बीड ) हे तिघे आपल्या मोटार सायकल ( क्र.एम.एच.१२/ बी.ई.२५४३ ) वरून नीरेहून जेजुरीच्या दिशेने जात होते. त्यावेळी कामठवाडी जवळ करंज नाला येथील स्मशानभूमी समोर, जेजुरीहून येणाऱ्या कार ( क्र.एम.एच.९ /डी.एक्स.८०५३ ) ने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीररित्या जखमी झाले. या दरम्यान जखमींना पुढील उपचारार्थी जेजुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता आदिनाथ सोनवणे व गजानन थोरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर बाळू सानप यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघाताची खबर अशोक शांताराम बडे यांनी जेजुरी पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार पोलिसांनी कार चालक श्रीकांत मारुती नाईक ( वय ५१ रा.अंबप वाडी, ता. हातकंगले ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार केशव जगताप हे करित आहेत.

You might also like