नीरा : मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू, एक बेशुध्दावस्थेत

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघी महिलांना विनानंबरच्या काळ्या रंगाच्या स्विफ्टकारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक महिला बेशुद्धअवस्थेत खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. माञ या अपघातानंतर नीरा गावात अपघात की घातपात याबाबत नागरिकांत चर्चा होती. अखेर या अपघाताचा घातपात उघडकीस आणण्यास जेजुरी पोलिसांना यश आले आहे. या अपघातातील दोघांना जेजुरी पोलिसांनी गजाआड केले आहे.

नीरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील नीरा गावातून जाणाऱ्या सातारा- नगर रस्त्यावरुन एक एप्रिलला सकाळच्या साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी वैशाली संजय काशीद ( वय -४२)व सुनिता मोराळे (वय-३६) निघाल्या होत्या. त्या दोन महिलांना काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट च्या स्विफ्ट गाडीने पाठीमागून जोरदार ठोकर दिली त्या धडकेत त्या दोघी जबर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत
पडल्या होत्या. त्यांना लोणंद येथील साविञी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान वैशाली संजय काशीद (वय -४२) यांचा चार एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी महिला सुनिता मोराळे या अद्यापही बेशुद्ध अवस्थेमध्ये उपचार घेत आहेत.

सदर अपघातानंतर स्विफ्ट कार नीरा नदीच्या पुलावर बंद पडल्याने चालक गाडी सोडून पळून गेला होता. त्या गाडीचा पंचनामा करून नीरा पोलिसांनी गाडीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे व भौतिक पुराव्यावरून
तपास करीत सदर गाडीचा चालक संकेत राजू होले (वय-२३) रा. गोपाळवाडी ता. दौंड याला ताब्यात घेतले.
या दरम्यान सदरचा अपघात हा अपघात नसून घातपात असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या घटनेतील मुख्य आरोपी संकेत राजू होले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा अपघात जाणुन बुजुन केला असल्याचे सांगितले.

सदरचा अपघात व खुन करण्याबाबत संकेत होले याला त्याचा मिञ रणजीत सुशांत जेधे (रा. नीरा) याने
सुनीता मोराळे ही महिला त्यांच्या घरच्यांना खूप त्रास देत आहे. समजूनही सांगत असता ऐकत नाही . त्यामुळे घरगुती वातावरण चिंतेत आहे. तिचा काटा काढायचा आहे असे सांगितले व त्याबदल्यात कुरकुंभ येथे हॉटेल काढून देऊन त्याचा सर्व खर्च करू हे आश्वासन रणजित जेधे याने दिल्याने संकेत होले तयार झाला. एक एप्रिलला रणजित जेधे याने त्याचा मिञ संकेत होले यास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जाणा-या सुनिता मोराळे यांना लांबून दाखविले त्यानुसार संकेत होले याने सुनिता मोराळे यांना जीवे मारण्यासाठी काळ्या रंगाची
स्विफ्ट कार अंगावर घातली. यावेळी मोराळे यांच्या सोबत चालणा-या वैशाली काशीद याही त्या धडकेत सापडल्या. या धडकेत सुनिता मोराळे व वैशाली काशीद बेशुद्धावस्थेत जखमी अवस्थेत पडल्या. अशा पद्धतीने सुनिता मोराळे यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता.

पोलिसांनी तपासात रणजित जेधे व संकेत होले यांच्या मोबाईलचे तांञिक विश्लेषण केले असता त्यामध्ये नीरा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष किरण जेधे याचा सुद्धा या कटात प्राथमिकदृष्ट्या सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सदर घटनेमध्ये जेजुरी पोलिसांनी कलम ३०२, ३०७ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून स्विफ्ट कार चालक संकेत होले व किरण जेधे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कस्टडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, फौजदार कैलास गोतपागर, नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, पोलिस हवालदार संदीप मोकाशी, गणेश कुतवळ, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, कदम, अक्षय यादव, पोलिस कॉन्स्टेबल निलेश जाधव, निलेश करे , महाडिक, शेंडे, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांनी विशेष कामगिरी केली.