तब्बल ३० किलो स्फोटके वापरुनही नीरव मोदीचा बंगला पडलाच नाही ? 

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्या प्रकरणी फरार असणाारा आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील बंगला आज (शुक्रवारी दि ८ मार्च) सकाळी स्फोटकांचा वापर करून जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्ब्ल ३० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर करूनही नीरव मोदीचा बंगला भुईसपाट झाला नाही. सदर बंगला खचला असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता पुढील १५ ते २० दिवसांत बंगला मशीनच्या सहाय्याने पाडण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नीरव मोदी यांच्या बंगल्यावर दोन महिन्यांपूर्वी कारवाईला सुरुवात झाली होती.  मशीनच्या सहाय्याने या बंगल्याचे पाडकाम सुरुही करण्यात आले होते. परंतु मशीनच्या सहाय्याने बंगला पाडण्यात प्रशासनाला अपयश आले होते. या बंगल्याचे दगडी आणि आरसीसी बांधकाम असल्याने हा बंगला सुरुंग लावून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.  यासाठी लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

नेमके काय घडले ?
नीरव मोदीच्या बंगल्याच्या चारही बाजूला सुरुंग लावण्यात आले. बंगल्यातील पिलरला होल पाडण्यात आले त्यात स्फोटके भरण्यात आली. वारयरिंग बॅटरीच्या सहाय्याने जोडून त्याचा ब्लास्ट करण्यात आला. या मोठ्या स्फोटानंतर नीरव मोदीचा बंगला भुईसपाट होईल असे वाटले होते परंतु असे काही झाले नाही. यानंतर बंगला पाडणाऱ्या पथकाने बंगल्याची पाहणी केली. भक्कम बांधकामामुळे बंगला जमीनदोस्त झाला नाही असे त्यांच्या लक्षात आले. परंतु बंगला खचला आहे हे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी सांगितले की, “नियंत्रित स्फोटामुळे बंगला पाडण्यात मदत झाली आहे. आता मशिनच्या मदतीने बंगला पाडण्यात येईल. यासाठी १५ ते २० दिवस लागतील.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतकेच नाही तर, “सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम करणाऱ्यांसाठी हा एक इशाराच आहे. नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम केल्यास अशीच कारवाई होणार” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.