नीरव मोदी आणि मल्ल्या ‘या’ कोठडीत एकमेकांना साथ देणार काय ?

लंडन : वृत्तसंस्था – नीरव मोदीचा लंडन न्यायालयाने जामीन नाकारला आहे. मात्र, या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाचे न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नीरव मोदीचे भारत सरकारला हस्तांतरण केल्यानंतर त्यालाही विजय मल्ल्याला ठेवण्यात येणार असलेल्या आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात येणार का? हा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकीलांना विचारला होता. १४ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणात नीरव मोदी भारत सरकारला हवा आहे. याआधी ९ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील आरोपी विजय मल्ल्याच्या हस्तांतरणाच्या खटल्याचीही सुनावणी याच न्यायालयात झाली होती.

विजय मल्ल्याला कोणत्या तुरुंगात ठेवणार असा प्रश्न लंडन न्यायालयाने उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या अर्थर रोड तुरुंगातील कोठडीचा व्हिडीओ न्यायालयात सादर करण्यात आला होता. हीच सुनावणी लक्षात ठेवून न्यायालयाने नीरव मोदीचे हस्तांतरण केल्यानंतर त्याला कोठे ठेवणार असा प्रश्न विचारला होता. यावर भारत सरकारच्यावतीने युक्तीवाद करणाऱ्या वकिलांकडून नीरव मोदीला मुंबईला पाठवण्यात येईल आणि बहुदा त्याची रवानगी मल्ल्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या आर्थर रोड तरुंगातच केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

विजय मल्ल्याचे भारत सरकारला हस्तांतरण झाल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोडच्या कोठडीत करण्यात येणार असल्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे. याआधी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाबला सुद्धा याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणि आता नीरव मोदीचे जर हस्तांतरण झाले तर त्यालासुद्धा आर्थर रोडमधील कोठडीतच ठेवले जाणार आहे.