निर्भया केस : ‘तिहार’मध्ये फाशी देण्यापूर्वीच्या 2 तासात काय घडलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशी देण्यापूर्वी तिहार तुरुंगात नेमके काय घडले याची माहिती समोर आली आहे. तिहार तुरुंगातील या ४ मारेकर्‍यांना पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी उठविण्यात आले. मात्र, या मारेकर्‍यांना संपूर्ण रात्र झोप आली नव्हती. तुरुंग अधिकार्‍यांनी त्यांना अंघोळ करण्यास सांगितले. पहाटे ४ वाजता तिहार तुरुंगाचे प्रमुख संदीप गोयल कारागृहात पोहचले. त्यांनी जल्लादला जेल नंबर तीनच्या फाशी गेटापाशी नेले. उपअधीक्षकांनी फाशीचे दोर गेटवर नेले. आरोपींना त्यांची अंतिम इच्छेनुसार पुजा पाठ करायला सांगितले. त्यासाठी तुरुंग प्रशासनाने एका पुजार्‍यास उपस्थित ठेवले होते.
यावेळी तेथे दोन डॉक्टर आणि एक पुजारी उपस्थित होते. त्यानंतर चौघाही आरोपींना चहा, नाश्ता करायला सांगितला.

फाशी गेटवर जल्लादने ८ फाशीचे दोर तयार केले. पश्चिम दिल्लीचे जिल्हा मजिस्ट्रेट तुरुंगात पोहचले. आणि त्यांनी चौघांना त्यांची अंतिम इच्छा विचारली. जेल डॉक्टरांनी चारही आरोपींची आरोग्याची तपासणी केली. त्यांनी चौघांनाही फाशी देण्यासाठी त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले. त्यानंतर चौघांना फाशी गेटजवळ नेण्यात आले. तुरुंग अधिकार्‍यांनी चौघांच्या चेहर्‍यावर काळे कापड घालून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. यावेळी तुरुंगात डीजी जेल, जेल अधीक्षक, ३ जेल उपअधीक्षक, २ डॉक्टर, एक जिल्हाधिकारी आणि एक पंडित उपस्थित होते.

त्यानंतर ठिक ५ वाजून ३०मिनिटांनी चौघांना एकाचवेळी फाशी देण्यात आली. त्यानंतर काही वेळाने त्यांना खाली उतरविण्यात आले. डॉक्टर पुढे झाले. त्यांनी चौघांची तपासणी करुन त्यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. यानंतर आता या चौघांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अत्यसंस्कारासाठी चौघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविले जाणार आहे.