निर्भया केस : ‘या’ दोषीला आत्ताच फाशी नाही होणार ? जेलचा ‘हा’ नियम येतोय ‘आडवा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यापूर्वी चौदा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. दोषी पवनजवळ अजूनही क्यूरेटीव्ह आणि दया याचिका दाखल करण्याचा पर्याय शिल्लक आहे. अशातच जर पवनने क्यूरेटीव्ह आणि दया याचिका दाखल केली तर त्याची फाशी रोखली जाऊ शकते. त्याच्यासोबत तीन अन्य आरोपींची फाशीसुद्धा रोखण्यात येईल. चारही दोषींना एकाचवेळी फाशी का दिली जाणार, ते जाणून घ्या…

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यापूर्वी नियमानुसार 14 दिवसांची वेळ देण्यात आली आहे. दोषी पवनजवळ अजूनही क्यूरेटीव्ह आणि दया याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. या कालावधीत त्याच्याकडून क्यूरेटीव्ह किंवा दया याचिका दाखल करण्यात आली तर डेथ वॉरंट कायद्यानुसार पुन्हा स्थगित होईल आणि फाशी पुन्हा टळेल.

पटियाला हाऊस कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत पवनचे वकील रवि काजी यांनी हे स्पष्ट केले नाही की, क्यूरेटीव्ह दया याचिका केव्हा दाखल केली जाणार आहे, परंतु ती दाखल करणार हे पक्के आहे. फाशी आणखी पुढे ढकलण्यासाठी पवन याचा वापर करू शकतो. निर्भयाचे अन्य तीन दोषी विनय, मुकेश आणि अक्षयचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. यामुळे आता सर्वांचे लक्ष पवनवर आहे.

यापूर्वी वकील एपी सिंह यांनी कायद्यातील पर्यायांचा आधार घेत कोर्टाकडून जारी झालेले 7 जानेवारी आणि 17 जानेवारीचे दोन डेथ वॉरंट स्थगित केले होते. पाहिल्या डेथ वॉरंटनुसार दोषींना 22 जानेवारी आणि दुसर्‍यानुसार 1 फेब्रुवारला फाशी होणार होती. दोन्ही वेळा दोषींची याचिका प्रलंबित असल्याने कोर्टाने स्वताच कायद्यानुसार डेथ वॉरंट स्थगित केले होते. नव्या डेथ वॉरंटनुसार चारही दोषींना 3 मार्चला फाशी होणार आहे. जर या दरम्यान पवनने क्यूरेटीव्ह किंवा दया याचिका दाखल केली तर डेथ वॉरंटवर न्यायालय पुन्हा स्थगिती आणेल.

हा आहे जेलचा नियम
जेलच्या नियमानुसार एका गुन्ह्यात एकापेक्षा जास्त आरोपींना दोषी ठरवले गेल्यास त्या सर्वांना एकाच वेळी फाशी देण्याची तरतूद आहे. याशिवाय जेव्हा दोषींना फासावर लटकावण्याची वेळ, तारीख दिली जाते तेव्हा दोषींना कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यासाठी 14 दिवसांची वेळ दिली जाते. या दरम्यान दोषी सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका किंवा राष्ट्रपतींकडे दया याचिका करू शकतो. कोणत्याही दोषीची कोणतीही याचिका प्रलंबित नसेल तेव्हाच त्याच्याविरूद्ध डेथ वॉरंट जारी करता येते.