निर्भया केस : दोषी विनयनं ‘पीन’ गिळल्याचा आणि तोंडातून ‘रक्त’ येत असल्याचा केला दावा केल्यानं प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – फाशीची तारीख जवळ येत असल्याने निर्भया चा दोषी विनय याने तुरूंगात युक्तीवाद सुरू केला आहे. तो स्वत:ला आजारी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी त्याने तुरूंगातील अधिकाऱ्यांना सांगितले की त्याने एक पिन गिळली असून त्याच्या तोंडातून रक्त येत आहे.

या घटनेची माहिती लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि एक्सरे काढण्यात आला. रिपोर्ट आल्यानंतर त्याचा दावा चुकीचा ठरवण्यात आला. कारागृह अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की चारही दोषींची प्रकृती चांगली आणि निरोगी आहे.

डेथ वॉरंटनुसार निर्भयाच्या दोषींना ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. यामुळे त्यांची झोप उडालेली आहे. दोषी विनय याबद्दल अधिक अस्वस्थ आहे आणि सतत आजारी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भिंतीवर डोके आपटून स्वतःला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याने पिन गिळल्याचा दावा केला आहे.

तुरूंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषींना हे माहित आहे की शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते तंदुरुस्त असतील तेव्हाच त्यांना फाशी दिली जाऊ शकते. वैद्यकीय अहवालात ते जर अस्वस्थ घोषित झाले तर त्यांची फाशी पुढे ढकलली जाऊ शकते.

त्यामुळे दोषी याचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात कारागृह अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सर्व दोषी पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी दररोज केली जात आहे. समुपदेशनही एकाचवेळी केले जात आहे.