Nirbhaya case : निर्भयाच्या ‘त्या’ मित्रानं केलं लग्न, 2 वर्षापासुन मुलासह जगतोय ‘जीवन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी गोरखपूरच्या वकिलाचा मुलगा आणि निर्भयाचा मित्र अवनींद्र याची भूमिका महत्वाची होती. या घटनेचा एकमेव साक्षीदार असणाऱ्या मित्राने केवळ मैत्रीच निभावली नाही तर आरोपीला फाशीपर्यंत नेण्यात त्यांची साक्ष महत्त्वाची ठरल्याचे सिद्ध झाले. निर्भयाच्या या मित्राबाबत काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

निर्भयाच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी लढणारा निर्भयाचा मित्र स्वतः इतका अस्वस्थ झाला होता की त्याला सावरण्यासाठी त्याच्या परिवारास तब्बल चार वर्ष लागले. तो कसाबसा या धक्क्यातून मुक्त झाला आणि त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले. आता तो आपल्या दोन वर्षांचा मुलगा आणि पत्नीसमवेत एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून परदेशात आहे. परंतु त्याला अजून या गोष्टीची खंत आहे की आरोपींना मृत्यूदंड ठोठावल्यानंतरही काहीना काही अडचणी समोर येतच आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री निर्भया आपला मित्र अवनींद्र याच्यासह बसमधून जात होती. यावेळी नराधमांनी तिला केवळ वासनेचे शिकार बनवले. या घटनेने अवनिंद्रला आतून हादरवून सोडले. त्याला मोठा धक्का बसला होता. साक्षीदार म्हणून केवळ तोच होता ज्याच्या साक्षीने दोषींना शिक्षा होऊ शकत होती.

बराच काळ अवनींद्रने अनामिक म्हणून आयुष्य जगले आणि अजूनही तो तसेच जीवन जगत आहे. घटनेचा उल्लेख होताच वडील भानू प्रकाश पांडे भावूक होतात. ते म्हणतात की कोणालाही बोलणे आणि ऐकणे फार सोपे वाटत असते परंतु ज्या रात्री ही घटना घडली त्यारात्री आमची परिस्थिती काय होती हे आम्ही शब्दांत वर्णन करू शकत नाही. कसा तरी माझा मुलगा या वेदनांवर मात करत उभा राहिला आहे.

विशेष म्हणजे अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांची फाशी तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने राष्ट्रपतींसमोर दोषी पवन गुप्ता यांची दया याचिका प्रलंबित असल्याने पुढील आदेश येईपर्यंत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती दिली आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाने पवन याची सुधारात्मक याचिका फेटाळून लावली आहे.