निर्भया केस : फाशी टाळल्यानंतर कोर्ट म्हणालं – ‘जेव्हा दोषी देवाला भेटतील त्यावेळी कोणतीही तक्रार असू नये’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणी चारही दोषींच्या फाशीवर पटियाला हाउस कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली आहे. जुन्या डेथ वॉरंटनुसार, सर्व दोषींना आज मंगळवारी सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. हा निर्णय सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी सुनावला.

त्यांनी म्हटले की, जोपर्यंत एका दोषीकडे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे, तोपर्यंत त्यास फाशी देता येणार नाही. याशिवाय फाशी टाळण्याचे आणखी एक मुख्य कारण हे होते की, दोषींपैकी एकाची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे, ज्यानंतर डेथ वॉरंटला स्थगिती देण्यात आली.

कोर्टाने तिसर्‍यांदा डेथ वॉरंटला स्थगिती देताना म्हटले की, कुणीही दोषी जेव्हा इश्वराला भेटेल तर त्याच्याकडे कोणतीही तक्रार असू नये की, त्याला सर्व कायदेशीर पर्याय अवलंबण्याची परवानगी मिळाली नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी म्हटले की, दोषी पवन गुप्ताच्या दया याचिकेवर निर्णय झाल्याशिवाय मृत्यूदंड देता येणार नाही.

आज दिली जाणार होती फाशी

कोर्टाने म्हटले की, राष्ट्रपतींकडे दोषीची याचिका प्रलंबित आहे. यासाठी 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता दोषींना होणारी फाशी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशाची कॉपी दोषींना देण्यात आली आहे. पवन गुप्ताचे क्यूरेटिव्ह पिटिशन यापूर्वीच सुप्रीम कोर्टान फेटाळले आहे.

काय आहे प्रकरण

दक्षिण दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री सहा लोकांनी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता आणि तिला अतिशय निर्दयीपणे मारहाण करत जखमी करून बसमधून रस्त्यावर फेकले होते. निर्भयाचा नंतर 29 डिसेंबर 2012 ला सिंगापुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या खळबळजनक गुन्ह्यातील सहा आरोपींपैकी एक राम सिंह याने तिहार जेलमध्ये कथितरित्या आत्महत्या केली होती, तर सहावा आरोपी अल्पवयीन होता. त्याला तीन वर्षासाठी बाल सुधारगृहात ठेवल्यानंतर 2015 मध्ये मुक्त करण्यात आले होते.