निर्भया केस : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये, पण आधी घेतली ‘कोरोना’ टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींना फाशी देणारा जल्लाद मंगळवारी तिहार कारागृहात पोहचला. मात्र जल्लाद पवनला देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या. पवन जल्लादने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार कारागृहात चौघांच्या डमीला फाशीवर लटकविण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जल्लाद पवन तिहार कारागृहात येण्यापूर्वी त्याला चाचण्या कराव्या लागल्या. कारागृहात पवन जल्लादची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली तसेच शारीरिक तपासणी करण्यात आली. आज पहाटे जल्लाद पवन याने चौघांच्या डमीला फाशीवर लटकवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. या चारही आरोपींना 20 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता तिहारमध्ये फाशी देण्यात येणार आहे. त्याची ही पूर्वतयारी आहे.

नर्भया प्रकरणातील आरोपींना फाशिची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या फाशीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच फाशिच्या शिक्षेला स्थिगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. तर आरोपी मुकेशची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळून लावली आहे.